अभिनव भारतार्थ.. पुन्हा हवे वि.दा…

अभिनव भारतार्थ.. पुन्हा हवे वि.दा…

१९९८ मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर अकोल्यातील विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी यांच्या ‘मातृभूमी’ या दैनिकातून फोटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साधारण दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यावेळी थेट कॉम्प्यूटरवर बातम्या टाइप करण्यास सुरुवात केली. २००० पासून पत्रकारीतेला ‘करिअर’ म्हणून निवडले. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने फक्त जिथे जिथे काम केले, त्या वृत्तपत्रांतून बातम्या, प्रसंगी लेख लिहिण्याची संधी मिळाली. ब्लॉग सुरू कर असं अनेक जण सांगत होते. २०१८मध्ये www.prasannajakate.com डिझाइन झाली, पण ती या ना त्या कारणाने खुप प्रसिद्ध केली नाही. ब्लॉगही सुरू केला नव्हता. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने ही वेबसाइट व ब्लॉग दोन्ही सुरू करण्याचा आनंद होत आहे.

प्रसन्न जकाते, नागपूर
www.prasannajakate.com

‘रणाविण कुणा स्वातंत्र्य मिळेना’, या प्रखर विचारांमुळे अनेक क्रांतिकारकांचे आजही प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अभिनव आणि अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत असणाऱ्या विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक, साहित्यिक असे विविध पैलू असणाऱ्या ‘वि.दां’नी ज्या दुरदृष्टीने अभिनव आणि अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले, तो त्यांना अभिप्रेत असलेला ‘अभिनव भारत’ आपण त्यांना देऊ शकलो काय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा.

अंदमान येथील सेल्यूलर जेलमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आलेत.

ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले म्हणून गोऱ्यांनी त्यांचा अनन्वीत छळ केला. दोन काळ्या पाण्याच्या (५० वर्षे) शिक्षा सावरकरांना ठोठाविण्यात आल्या. तेव्हापासून सुरू झालेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची उपेक्षा आजही थांबलेली नाही. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकारांनी अशी कोणती अपेक्षा व्यक्त केली होती, की ज्यामुळे त्यांची उपेक्षा आजही कायम आहे. त्यांना फक्त अभिप्रेत होता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असेलला मानवतावादी समाज. चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद असलेली तरुणाई. देशाची जी परिस्थिती आज आहे, ती स्वातंत्र्यवीर सावकरांनी अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाच ओळखली होती. इंग्रज आज ना उद्या देश सोडून जातील हे त्यांना ठाऊक होते. परंतु देशाची झपाट्याने बदलती स्थिती पाहून ते उद्विग्न होते. कदाचित आजही असतील.

स्वातंत्र्यवीर सावकरांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर आपल्याला दोन गोष्टी नक्की कळतील. पूर्वार्धात काम करणारे प्रखर राष्ट्रभक्त आणि जहाल क्रांतीकारी विनायक दामोदर सावरकर. ज्यांनी प्रसंगी अन्यायायाविरोधात शस्त्रक्रांती केली, तर उत्तरार्धात समाजसुधारक म्हणून दीन-दलितांना न्याय मिळवून देणारे सावरकर. देशाला सोडताना इंग्रजांनी जातीय विखारी पेरण्यात यश मिळविले होते. ही बाब स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेरली. त्यामुळेच त्यांनी समाजातील जातीय भींती पाडण्याचे काम हाती घेतले. त्यांनी रत्नागिरीत पतितपावन मंदिर स्थापन केले, जेथे सर्वधर्मीयांना खुला प्रवेश होता. १५ आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले. वर्णभेदी, जातीभेदी समाजावर त्यांनी प्रहार केले. हे काही उगाच नाही. पण आपण आजही स्वातंत्र्यविरांनी पेरलेल्या त्या संस्कारबिजांचे वटवृक्ष करू शकलेलो नाही. आजही आपण मानसिक पारतंत्र्यातच आहोत.

त्यामुळेच अद्यापही अनेक आसुरी शक्ती आपल्यात जात-पात, धर्म या नावाखाली फूट पाडण्यात यशस्वी ठरतात. आजही आम्ही अनेकांचा जात, वर्ण, धर्म याच्या आधारावर टोकाचा द्वेष करू शकतो. आम्हाला चटणी-भाकर नाही तर पिझ्झा, बर्गरचा आहार पसंत पडतो. इतकेच काय तर आम्ही प्रार्थनेसाठी आपापल्या वास्तूंची हिश्शेवाटणी करून घेतली आहे. पाश्चात्य संस्कृतीचे आम्ही इतके अंधानुकरण करीत चाललो आहोत की, संस्कारांची जागा अनैतिकता, व्याभिचार अन‌् स्वैराचाराने घेतलीय, याचे स्मरणही आम्हाला नाही. भरकटलेल्या तरुणाईच्या मनातून राष्ट्रभक्ती ओसरत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी ‘रण’ लढविण्याची वेळ आता आली आहे. पुन्हा एकदा गुलामगिरीविरोधात शस्त्र उचलावे लागणार आहे. हे रण लढावे लागणार आहे, आपल्यालाच आपल्याशी. स्वदेशी, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, समान न्याय असलेल्या समाजनिर्मितीसाठी पुन्हा एकदा मानसिक शस्त्र उचलावे लागणार आहे अन‌् पाडाव्या लागणार आहेत त्या सर्व भींती ज्या आपल्या अभिनव-अखंड भारत निर्मितीच्या आड येत आहेत. यासाठी पुन्हा जन्म द्यावा लागणार आहे, त्याच ‘वि.दां..’ना. आपल्या प्रत्येकात…

२८ मे २०२१


(छायाचित्र सौजन्य : श्री. चंद्रकांत लाखे, लाखे प्रकाशन तथा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूर)

error: Content is protected !!